ABOUT COMPANY
We’re the #1 solar energy provider!
- Satisfaction Value For Money Solution
- Business Accounting Management
- Inventory Management Tracking System
- The world as it is heavily dependent
Our History
Founded by John Smith, Co: Greenly was founded in Cambridge, United Kingdom In May 2005
SMALL PROJECT
2009
MULTI PROJECT
2015
FIRST PROJECT
2007
CORPORATE PROJECT
2012
संवाद सेतू प्रतिष्ठान – एक आनंददायी प्रवास
संभाजीनगरमधील आम्ही काही मैत्रिणी २००६ मध्ये गुरुजी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बरेच दिवस एकत्र काम करत होतो. कार्यक्रम उत्तम झाला; ध्येय साध्य झाले. पण समाजाप्रती तळमळ असणाऱ्या, समाजऋणातील आपला खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे असे मनापासून वाटणा-या आम्हा काही समविचारी , समवयस्क,पण विविध क्षेत्रातील मैत्रिणींना चैन पडत नव्हती. समाजात अनेक प्रश्न आहेत. कोणत्या तरी प्रश्नावर आपण काम केले पाहिजे, असे मनापासून वाटत होते. याच सुमारास आम्हा सर्वांचच दुसरं अपत्य हे पौगंडावस्थेत होतं. आम्हा सर्वांनाच असं जाणवत होतं की काही बाबतीत ही मुलं आपल्या अपेक्षांपेक्षा काहीतरी वेगळ वागत आहेत; प्रसंगी हाताळायला कठीण जात आहेत. बोलायला गेलं की संवादापेक्षा वादच जास्त होतायत . चिडचिड, एकलकोंडेपणा , घुमेपणा वाढला आहे. आमची कंपनी फारशी आवडत नाही. आमच्याबरोबर बाहेर येणं टाळत आहेत. मोबाईल, टी.व्ही. यांचा वापर वाढला आहे. त्यातच सोशल मिडिया, इंटरनेट यांची सहज उपलब्धी आहे. या सर्वांमुळे कुटुंबातला संवाद हरवत चाललेला दिसत होतं. वयात येणाऱ्या मुलांमध्ये अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. या बदलांविषयी त्यांच्याशी योग्य संवाद होण्याची गरज असते. अन्यथा त्यांना अने धोक्यांना सामोरे जावे लागते. पण आई-बाबा दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त ! मग त्यांच्याशी कोण, कधी आणि कसं बोलणार? त्यांच्या काल्पनिक दुनियेत वास्तवाचे भान कसे देणार? या प्रश्नांनी जवळपास सगळ्याच अस्वस्थ होत होतो. विचारमंथन करत होतो. यातूनच आकाराला आला एक अनोखा संवाद प्रयोग –
संवाद सेतू प्रतिष्ठान !
वयात येणाऱ्या मुलामुलींच्या मनातील कुतूहलाला हसत-खेळत, गप्पा मारत पण शास्त्रीय दृष्टीकोनाची जोड देऊन निरोगी भावविश्व घडविणारी संस्था ! ‘उमलत्या वयाशी जुळवून घेण्याची केविलवाणी धडपड करणा-या किशोरवयीन मुला-मुलींना सुयोग्य जीवनदृष्टी देणे ‘ हाच कामाचा केंद्रबिंदू असावा, असे सर्वानुमते ठरले . ‘ स्वयंविकासातून समाजपरिवर्तन ‘ या विचाराने जानेवारी 2007पासून नियमित एकत्र येत गेलो.
सामर्थ्याला जाणूया कर्तव्याला जागूया
दृष्टी घेऊन जाणीवेची नवे आकाश पेलूया!
हे आमचे ध्येयवाक्य ठरले.
सुरवात कुठून करूया? जरी आमच्यापैकी काहीजणी डॉक्टर असल्या; तरी या विषयाचं प्रशिक्षण घेणं आम्हाला आवश्यक वाटलं. म्हणून अशा प्रकारचं काम करणाऱ्या काही संस्थांकडून आम्ही प्रशिक्षण घेतलं. लैंगिकता प्रशिक्षण (Sexuality Workshops ) म्हणजे नक्की काय? तर केवळ प्रजनन विज्ञान नव्हे; यात देहबदल, देहप्रतिमा, सौंदर्य या कल्पना तर स्पष्ट केल्या जातातंच; पण त्याच्या कितीतरी पलिकडच्या पण अत्यंत महत्वाच्या अंगांचाही यात समावेश असतो. समृद्ध नातेसंबंध, निकोप लिंगभाव, स्व-आदर, इतरांचा आदर, भावनांचे नियमन, ध्येयनिश्चिती, आंतरिक सौंदर्याची जाण, स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारीची जाणीव, मैत्री व समवयस्कांचा प्रभाव, भिन्नलिंगी मैत्रीतील संयम व मर्यादा, आकर्षण आणि प्रेम यातील फरक; मानसिक ताण तणावांचे व्यवस्थापन, जबाबदार लैंगिक वर्तन, सोशल मिडियाचा सुयोग्य वापर कसा करावा ; कुटुंब, समाज, देश यासंबंधीची जाण व दृष्टीकोन, हे व असे अनेक विषय!
वरील सर्व विषयांची केवळ माहिती देणे, हा आमचा उद्देश्य नव्हताच. कारण सध्या माहितीचा स्फोट झाला आहे. पण या माहितीचं रुपांतर ज्ञानामध्ये होणं आवश्यक आहे. त्या ज्ञानाकडे बघण्याचा सुयोग्य दृष्टीकोन तयार होणं आवश्यक आहे. हे झालं तरच वर्तनबदल होईल , याची आम्हाला जाणीव होती. या सर्व विषयांसंबंधी आम्ही मुलांबरोबर बोलायला , संवाद साधायला लागलो. एखादा विषय रंजक पद्धतीने कसा पोहोचवता येईल , याचे तंत्र आम्हाला हळूहळू समजले. आता आम्ही विविध माध्यमांमधून मुलांशी संवाद साधतो. यात गटचर्चा, फिल्म्स, पी. पी.टी. , भूमिकानाट्य ( रोल प्ले ) , खेळ इत्यादींचा समावेश करतो.
सुरवातीला आम्ही फक्त मुलींसाठी अशा कार्यशाळा घेत होतो. पालकांच्या आग्रहावरून लक्षात आले, की मुलींशी निदान आई तरी बोलते; पण मुलांशी तर कोणीच बोलत नाही. त्यांची खूप घुसमट होते. किशोरवयीन मुलांना पण प्रशिक्षणाची तितकीच गरज आहे; हे जाणून मुलींबरोबरंच मुलांसाठीही कार्यशाळा घ्यायला सुरवात केली. सुरवातीला मुलामुलींना वेगळे बसवत असू; पण त्याऐवजी जर एकत्र बसवून सर्व विषय मोकळेपणाने घेतले; तर परिणाम जास्त चांगला होतो; असे लक्षात आले आहे. म्हणून आता एकत्र कार्यशाळा घेतो. परिणाम अतिशय उत्साहवर्धक आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास ३५००० मुलामुलींपर्यंत पोहोचलो आहोत.
कार्यशाळा घेण्यासाठी शाळांना संपर्क करावा लागतो. जिल्हापरिषदेच्या, महानगरपालिकांच्या शाळांपासून तर अगदी उच्चभ्रू शाळांमध्येही कार्यशाळा घेतो. सर्व मीडियमच्या, सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये घेतो. इंग्रजी , हिंदी, मराठी या तिन्ही भाषांमध्ये कार्यशाळा घेतो.
वर्षभर एकाच वर्गासाठी विविध विषय घेऊ, अशी आम्ही शाळेला विनंती करतो. पण सर्वच शाळा इतका वेळ द्यायला तयार नसतात. अशा वेळी जितका वेळ शाळा देईल, त्याप्रमाणे आम्ही कार्यशाळा घेतो.
वर्षभर शाळांमध्ये चालणा-या कार्यशाळांव्यतिरिक्त दरवर्षी उन्हाळ्यात एकदा व दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एकदा अशा दोन कार्यशाळा आम्ही खुल्या घेतो. शहरातील सर्व शाळांमधील, सर्व बोर्डांच्या, सर्व मिडियमच्या मुलांचा यात सहभाग असतो. साधारणत: दोन पूर्ण दिवसांची कार्यशाळा असते. यात विविध विषय घेतले जातात.
कार्यशाळेच्या सुरवातीला pre test घेतो. कार्यशाळा संपल्यानंतर post test घेतो. या tests knoweledge, attitude आणि gender या तीन विषयांच्या असतात.
या कार्यशाळांनंतर मुलांच्या डोळ्यात नव्याने आलेली चमक पाहिली, की आम्हाला सर्वांनाच कृतकृत्य वाटते.
कार्यशाळा कशी झाली यासाठी मुलांचा प्रत्यक्ष अभिप्राय, शाळेच्या मुख्याध्यापकांचा अभिप्राय घेतो. हे अभिप्राय खूप उत्साहवर्धक असतात.
कार्यशाळा कशी झाली? काय जमले, काय चुकले , अधिक चांगले काय करता येईल याचा उहापोह करण्यासाठी शोध बोध बैठक घेतो. दर महिन्याला चिंतन बैठक घेतो. पुढील महिन्याचे नियोजन करतो. या बैठका बरेचदा रात्रीच घ्याव्या लागतात.
मुलामुलींच्या आग्रहाखातर ‘ पालक कार्यशाळा ‘ घ्यायला सुरवात केली. आता तोही आमच्या कामाचा अविभाज्य भाग बनला आहे.
मुलामुलींबरोबर शिक्षक अधिक काल असतात, वर्षभर असतात. या दृष्टीने ‘ शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा’ घ्यायला सुरवात केली. यालाही चांगला प्रतिसाद आहे.
कामाची गरज म्हणून आमच्यापैकी चार जणींनी ‘ मनोविकास शास्त्र ‘ ( psychology ) याचा अभ्यास केला. शाळांमध्ये आज काल समुपदेशकांची खूप गरज भासते. आम्ही आता आमचे ‘ हितगुज ‘ समुपदेशन केंद्र पण सुरु केले आहे. इथे वैयक्तिक समुपदेशन पण केले जाते.
या कामाव्यतिरिक्त आम्ही ‘ गप्पाकट्टा ‘ नावाचा उपक्रम दर महिन्याच्या तिस-या गुरुवारी चालवतो. समविचारी नवीन मैत्रिणी सामाजिक कामात जोडल्या जाव्यात , हा यामागचा उद्देश आहे. यात आधीच ठरवलेल्या विषयावर प्रत्येक महिलेला व्यक्त होण्याची संधी मिळते.यासाठी त्या त्या वेळच्या ज्वलंत विषयाची निवड केली जाते.
याशिवाय विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या बौद्धीकांचे आयोजन करतो. विशेष उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींच्या मुलाखती आयोजित करतो. हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असतात. दरवर्षी किमान एक सामाजिक प्रकल्प पहाणे, अभ्यासणे, शिकणे, प्रेरणा घेणे हाही आमच्या कामाचा एक भाग!
हे काम करताना काय मिळते? तर आत्यंतिक समाधान आणि आनंद! शिवाय समविचारी, जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या त्या वेगळ्याच! ‘ विविधतेत एकता ’ याचा आम्ही सतत प्रत्यय घेत रहातो. आमच्यापैकी प्रत्येकीत काहीतरी विशेष आहे. कोणी संपर्कात उत्तम तर कोणी संगणक हाताळण्यात! कोणी फोटो काढणे, रेकॉर्डींग करणे यात तर कोणाचे संवादकौशल्य अप्रतिम! मुलांना एखादा विषय समजावा म्हणून आम्ही भूमिकानाट्य करतो.( Role Play ) . आमच्यापैकी कितीतरी जणींना हे करता करताच याचा शोध लागला की आपण अभिनय छान करुं शकतो. अशा अनेक जणींना त्यांच्यातील सुप्त क्षमतांचा शोध लागला.
आम्ही आता कॉलेजवयीन मुला-मुलींसाठीही कार्यशाळा घ्यायला सुरवात केली आहे. संभाजीनगरच्या बाहेरही आम्ही कार्यशाळा घेतो. हा प्रवास खूप आनंददायी आहे, सृजनशील आहे.
व्यक्तीविकास करत सुरवात झाली; तरी आमच्या या प्रवासाचे ध्येय हे सर्व प्राणिमात्रांची सुख-शांती हेच आहे. म्हणूनंच या प्रवासाची दिशा –
मम सुख मम हित → ममजन सुख ममजन हित
बहुजन सुख बहुजन हित → सर्वजन सुख सर्वजन हित!
अशीच आहे आणि राहिल.
